महर्षि व्यास :- डॉ . प . वि . वर्तक

महर्षि व्यास
लेखक : डाॅ.प.वि.वर्तक
संकलन-गो.रा.सारंग(9833493359)
   आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा या नावाने ओळखली जाते. व्यास पौर्णिमा असेही तिला म्हणतात; कारण महर्षि व्यास मुनी हे सर्वांचे गुरु मानले गेले आहेत. व्यासांचा जन्म या तिथीस झाला अशी एक कल्पना आहे. पण ती उचित नाही; कारण व्यासांचा जन्म कधी झाला हे त्यांनी कुठेच नोंदलेले नाही.
   व्यासांचा जन्म एका द्वीपावर झाला व ते वर्णाने काळे होते. म्हणुन त्यांना कृष्ण द्वैपायन असे नांव मिळाले. परंतु पुढे त्यांनी वेदांची व्यवस्था लावली म्हणून त्यांना 'व्यास' ही पदवी मिळाली. पराशर ऋषीपासून मत्स्यगंधा सत्यवतीस जो पुत्र, अविवाहित अवस्थेत झाला तोच व्यास. शूद्र कोळिणीपासून जन्म झाल्यामुळे हा पुत्र जन्मतः शूद्र असला तरी स्वकर्तृत्वाने तो ब्राह्मण ठरला. ब्राह्मणामध्येहि वरिष्ठ ठरला. बालपणीच तपस्या आरंभून तो मुनिश्रेष्ठ, सिद्ध पुरुष झाला. सिद्धी मिळाल्यावर मातेस सोडून दूर जातांना त्याने सांगितले की तूं स्मरण केलेस की मी लगेच भेटेन.
   व्यास हे महाभारत हा काव्यात्मक इतिहास लिहिण्यामुळे ख्याति पावले. अठरा पुराणेहि नंतर त्यांनीच रचली अशी कल्पना आहे. महाभारत हा अतिविस्तृत एक लक्ष श्लोकांचा ग्रंथ लिहिणे योजले, तेव्हा इतके लिहिणार कोण हा प्रश्न पडला. गणपतीने लेखन करण्याचे काम पत्करले, पण त्याने अट घातली की तू सांगितलेले मी लिहीले पण तू पुढे लगेच सांगितले नाहीस तर मी काम बंद करीन. व्यासांनीहि अट घातली की तू समजल्याविना लिहिता कामा नये. अटीतटीने हा सामना चालू झाला. व्यास शीघ्र कवि असले तरी केव्हा तरी अडचण येई; तेव्हा व्यास गूढ श्लोक सांगत. त्यावर विचार करत गणपती बसला की हे पुढील रचना करीत. महाभारतात असे 8800 गूढ श्लोक आहेत.
   महाभारतात असंख्य विषय मांडलेले आहेत. ते सगळे ज्ञानी व्यासांनी पचविलेले होते. नियोग पद्धतीने त्यांनी धृतराष्ट्र, पंडु, व विदूर यांना जन्म दिला. ते स्वतः शास्त्रज्ञ, सायण्टिस्ट होते. त्यामुळे त्यांनी गांधारीचा पाडलेला गर्भ घेऊन, त्यावर संशोधन करून शंभर कौरव निर्माण केले. क्रोमोसोम्सचे पूरे ज्ञान त्यांना होते, त्यामुळे 'गुणविधी' हे सायण्टिफिक नांव त्यांनी त्या तत्त्वांना योजले. गुण व विधी म्हणजे कामे ठरविणारी ही तत्त्वे 23 असतात हेहि त्यांनी नोंदलेले आहे. आज सायन्स क्रोमोसोम्स 23 आहेत असेच म्हणते. यावर अनुवंशिक रोग अवलंबून असतात हे व्यासांचे म्हणणेहि सायन्सने आता मानले आहे. व्यासांना खगोलशास्त्रहि अवगत होते. त्यांनी श्वेत, श्याम व तीव्र या नावाखाली युरेनस, नेपच्युन, प्लुटो या ग्रहांची स्थाने महाभारत युद्धसमयी कुठे होती ते नोंदलेले आहे. सर्व ग्रहांची स्थाने त्यांनी दोन पद्धतीने म्हणजे सायन-निरयन मानाने नोंदलेली आहेत. त्यावरून महाभारतीय युद्ध रविवार दि.16ऑक्टोबर5561 इसवीसनपूर्व या दिवशी झाले हे मी निश्चित ठरवू शकलो.
   अभिजित् नक्षत्र गगनातून ढळले होते ही वैज्ञानिक सत्यकथा त्यांनी महाभारतात लिहून ठेवली आहे. असंख्य नक्षत्रे गगनात असूनहि केवळ एकाबद्द्ल ते सांगतात आणि आजचे विज्ञान नेमके तेच नक्षत्र इ.सनपूर्व 12000वर्षे या काळी ढळले होते हे मानते, यावरुन व्यासांच्या दिव्य ज्ञानाची पारख होते. 'जी हलत नाहीत ती नक्षत्रे ही व्याख्या असली तरी नक्षत्रेही हलतात', असे व्यास म्हणतात, तेहि आजचे विज्ञान मानते आहे.
 महाभारतयुद्धारंभी अमावस्या होती हे सांगून ते म्हणतात की सूर्य उगवताच दोन भागांचा झाला व किरण फेकण्याऐवजी ज्वाला फेकू लागला. आजचे विद्वान यावरुन व्यासांना मूर्ख ठरवू बघतात कारण सूर्याचे दोन भाग कसे होतील असे त्यांना वाटते. पण ग्रहणसमयी सूर्य खरोखरीच दोन भाग दर्शवितो, मध्ये काळी तबकडी व भोवती प्रभामंडळ. खग्रास सूर्यग्रहणसमयी खरेच प्रचंड ज्वाला सूर्यपृष्ठावरुन उफाळलेल्या दिसतात असे आजचे सायन्स सांगते.
   'व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्|' व्यासांनी सारे जग उष्टे करुन टाकले आहे', असे म्हणतात ते यावरुन सत्य ठरते. कारण व्यासांना ज्ञात नाही असे काहीच नाही. आजच्या काळातील सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ आइनस्टाइन याने सिद्धांत मांडला की जो कुणी अतिवेगाने अन्तराळात जाऊन परतला तर त्याचे आयुष्य वाढले असल्याचे आढळेल. नेमका हाच सिद्धांत व्यासांनी एका कथेतून सांगितला आहे की ककुद्मी आपली कन्या रेवती हिला घेऊन ब्रह्मलोकी वरसंशोधनासाठी गेला आणि 27 चतुर्युगांनी म्हणजे किमान 216 वर्षांनी परतला, तरी तो जीवंत राहीला आणि रेवती तरुणच राहीली होती. तिचे लग्न बलरामशी लावले. प्रत्येक ग्रहावर काल भिन्न असतो हे तत्त्वहि व्यासांनी या कथेत सांगितले आहे.
  परा व अपरा या दोनहि विद्यांवर त्यांनी प्रभुत्व मिळविलेले होते. सिद्धीहि मिळवलेल्या होत्या. दिव्य दृष्टीची सिद्धी त्यांनी स्वतःचा शिष्य संजय यास दिली होती; येवढे सामर्थ्य होते. त्यामुळे ते जगत्गुरु ठरले; त्यांचा मान राखण्यासाठी गुरुपौर्णिमेस व्यासपौर्णिमा मानतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

karla leni

nageshwar mandir satara

"HINDAVI SWARAJYA SUVARN SINHASAN PUNARSANSTHAPANA NYAS"