शांततेचा भडका
https://sanatanprabhat.org/marathi/146073.html
‘शांतते’चा भडका उडणारच !
April 30, 2018
गेली काही वर्षे अणूयुद्धाच्या शक्यता वर्तवल्या जात असतांना या पंधरवड्यात जगभरात अचानक शांततेचे वारे वाहू लागले आहेत. एकमेकांहून वरचढ भयावह अण्वस्त्रांची निर्मिती करून महायुद्ध घडवण्यासाठी फुरफुरणारे बाहू आता एकमेकांना हस्तांदोलन करण्यासाठी पुढे आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रनिर्मितीच्या कार्यक्रमाने अवघे जग भयभीत झाले होते. मध्यंतरी उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातील संबंध कमालीचे ताणलेले होते. आता अचानक उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी येत्या मे मासापासून अण्वस्त्र चाचणी केंद्रे बंद करण्याचा निर्णय घोषित केला आहे. या निर्णयाने एकेकाळी उत्तर कोरियाला शह देणारी अमेरिकाही सुखावली आहे. एकमेकांचे सख्खे शेजारी असलेले उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात तर अण्वस्त्र चाचण्यांवरूनच ३६ चा आकडा होता. आता मात्र दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांचे पंतप्रधान एकमेकांच्या भेटीगाठी घेतांना दिसत आहेत. चीन-भारत ही एरव्ही युद्धाच्या उंबरठ्यावरील राष्ट्रे असूनही गत आठवड्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्साहाने स्वागत केले. वरवर पहाता तिसर्या महायुद्धात महत्त्वाची भूमिका निभावणार्या या राष्ट्रांच्या विचारसरणीत झालेला हा पालट एखादा ‘चमत्कार’ म्हणावा, असा आहे. सर्व राष्ट्रांकडून आपापसांत शांती प्रस्थापित करण्याचा मनोदय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ‘आता सर्व मळभ दूर होऊन सर्व काही छान छान होईल’, असे कुणाला वाटेल. ‘चर्चेनेच प्रश्न मिटतात’, अशा फुशारक्याही कुणी मारेल. प्रत्यक्षात मात्र जागतिक स्तरावर शांतता म्हणवणारी ही उलथापालथ सकारात्मक आहे का ?
युद्धाची सिद्धता !
‘काल-परवापर्यंत सारे जग उद्ध्वस्त करण्याची आसुरी महत्त्वाकांक्षा बाळगणारे किम जोंग यांच्या विचारांत रातोरात कसा काय पालट झाला ?’, ‘भूविस्ताराची राक्षसी महत्त्वाकांक्षा बाळगणार्या चीनला भारताचा कसा काय पुळका आला ?’, ‘एकेकाळी उत्तर कोरियावर खार खाऊन असलेली अमेरिका एक पाऊल मागे कशी आली ?’, या सार्या प्रश्नांचे उत्तर पहाता आता ज्याला शांततेचे ‘लेबल’ लावले जात आहे, ती शांतता स्मशानशांतता ठरणार आहे, हेच उघड होते. या सार्या युद्धखोर राष्ट्रांनी गेले काही मास स्वतःची शक्ती आजमावण्याचा प्रयत्न केला. ‘स्वतःला महासत्ता म्हणून सिद्ध करण्यासाठी अजूनही सिद्धता आवश्यक आहे’, ‘अद्याप काही युद्ध स्वतःच्या टप्प्यात नाही’, हे लक्षात आल्यावर ही राष्ट्रे आता शांततेचे गोडवे गात आहेत. त्यामुळे या देशांच्या प्रमुखांनी एकमेकांना दिलेले हस्तांदोलन, चर्चा आणि पाहुणचार हा तर देखावा आहे. पडद्यामागे सर्व कारनामे चालूच रहाणार आहेत, हे एक उघड गुपित आहे. एकमेकांना बेसावध ठेवून स्वतःची उर्वरित सिद्धता झाल्यावर पूर्ण शक्तीसह शत्रूच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे प्रकार येत्या वर्षात पहायला मिळाले, तर त्याचे आश्चर्य वाटणार नाही. अर्थात् हा मुत्सद्दीपणा ज्यांच्या अंगात मुरलेला आहे, ती राष्ट्रेही प्रतिकार करायला अल्प पडणार नाहीत. स्वतःवर वेळ आली की, शांती वगैरे वल्गना गुंडाळाव्याच लागतात, हे अमेरिका, उत्तर कोरिया, चीन यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. प्रश्न उरतो आपला !
अंतर्बाह्य सक्षम होणे आवश्यक !
जागतिक स्तरावर कमालीच्या वेगाने घडणार्या या घडामोडी पहाता भारताची पावले कशी पडतात, हे महत्त्वाचे आहे. देशाची अनेक क्षेत्रांत पिछेहाट झाल्यामुळे अमेरिका, रशिया आदी महासत्तांना शरण जाण्यावाचून आपल्याकडे पर्यायच नसतो. तसाच काहीसा प्रकार पंतप्रधान मोदी यांच्या चीन भेटीच्या वेळीही दिसून आला. गेले वर्षभर चीनने डोकलाममध्ये केलेल्या कारवायांनी आपल्याला बरेच हैराण केले. चीनच्या विस्तारवादामुळे बर्याचदा सीमेवर युद्धस्थिती ओढवलेली असते. भारताच्या अर्थव्यवस्थेला चिनी ड्रॅगननेच खिंडार पाडले आहे. असे असतांना भारत-चीन द्विपक्षीय चर्चेत दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये विश्वासाचा पूल सिद्ध व्हावा, यासाठी रणनीतीक मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ सैन्यच नाही, तर अन्य क्षेत्रांमध्येही संबंध सुधारण्याविषयी दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले आहे म्हणे ! डोकलामच्या तणावानंतर दोन्ही देशांत निर्माण झालेली कटूता दूर करण्यासाठी आता प्रयत्न केले जात असल्याचे परराष्ट्र सचिवांनी बैठकीत सांगितले. भारतीय अर्थव्यवस्था निकृष्ट चिनी उत्पादनांनी पोखरल्यामुळे अनेक देशी उद्योगव्यवसाय डबघाईला आले. स्थानिकांचे रोजगारही गेले आहेत. हे सर्व ‘जैसे थे’ असतांना एकमेकांसह चहा घेऊन आणि संगीत वाजवून संबंध सुधारणार आहेत का ? कटूता दूर करायची म्हणजे ‘परिस्थिती जशीच्या तशीच ठेवून ‘आता ती गोड झाली आहे’, अशी स्वतःच्याच मनाची समजूत काढायची आहे का ? चीनला त्याच्या भूमीवर जाऊन ठणकावले असते, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळा संदेश गेला असता. तसे झालेले नाही. आपण केवळ चीनवरच नाही, तर अनेक क्षेत्रांत अन्य देशांवर अवलंबून आहोत. उद्या युद्धाला तोंड फुटल्यानंतर कोण आपल्याला वस्तू आणि सेवा पुरवणार आहेत ? या मोठ्या मोठ्या देशांना भेटी दिल्यावर तेथे निर्माण झालेली वातावरण निर्मिती ही तात्कालीक असते. या उलट सद्यःस्थितीत देश कणखर बनवण्यासाठी अंतबार्ह्य व्यवस्था सक्षम आणि आत्मनिर्भर बनवणे कठीण असले, तरी त्यामुळे निर्माण झालेले परिणाम दूरगामी आहेत. हे ओळखून त्याकडे प्राधान्याने लक्ष दिल्यास बाकी देशांनी कोणतेही राजकारण केले, तरी तिसर्या महायुद्धाला तोंड देण्यासाठी आपणही सिद्ध होऊ, हे नक्की !
Categories संपादकीय
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा